आज आपण या लेखात Swatantra veer savrkar Essay in Marathi, Mahatma jyotiba phule essay in Marathi, Maza avadta sant essay in marathi, Maza avadta kavi marathi nibandh हे सर्व निबंध आपण पाहणार आहोत
Table of Contents
महात्मा जोतीराव फुले – एक समाजसुधारक
Mahatma jyotiba phule essay in Marathi
महात्मा जोतीराव फुले हे उच्च कोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र काया-वाचा-मने जपणाऱ्या, जोतीरावांचा जन्म १८२७ साली माळी समाजातील गोन्हे यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले. शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्यांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.
‘ज्ञान ही एक शक्ती आहे,’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे –
“विद्येविना मति गेली। मतीविना नीति गेली ।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले ।। इतके अनर्थ एका अविद्येने केले.”
जोतीराव फुले हे ‘कर्ते सुधारक’ होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन जोतीरावांनी पत्नीला- सावित्रीबाईंना – सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. जोतीराव व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले.
त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतीरावांनी चळवळ उभी केली. ‘बालहत्या प्रतिबंधक- गृहा ‘ची स्थापना केली. स्त्रियांसाठी, तसेच अगदी तळागाळातल्या लोकांसाठीही जोतीरावांनी बहुमोल सेवाकार्य केले. सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांना पाणी भरण्यास मज्जाव केला जात असे. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.
जोतीराव फुले यांनी अनेक मौलिक, विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. समाजातील पीडित-श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा जोतीरावांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याचे उत्कृष्ट चित्र त्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात रेखाटले आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काही विधायक उपायही या आपल्या लेखांतून सुचवले आहेत. १०० वर्षांपूवी लिहिलेले हे मौलिक विचार आजच्या ग्रामीण अर्थ- व्यवस्थेलाही क्याच प्रमाणात लागू पडतात, ही गोष्ट जोतीरावांच्या अलौकिक द्रष्टेपणाची साक्ष देणारी आहे.
जोतीरांवांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना ‘महात्मा’ असे यथार्थपणे गौरवले.
माझा आवडता संत- संत गाडगे महाराज
Maza avadta sant essay in marathi
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडित आहे. संत गाडगेबाबा हे या मालिकेतील एक महत्त्वाचे मौक्तिक, अगदी मागासलेल्या घरात जन्मलेल्या, शिक्षणाचे विशेष संस्कार नसलेल्या या महात्म्याने एवढे अमूल्य विचार लोकांपुढे मांडले की आपला विश्वासच बसत नाही.
२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्हयातील शेणगाव या गावी एका परिटाच्या घरी गाडगेबाबांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव होते डेबूजी, त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई, वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्या घरात कायमचे दारिद्रय होते. त्यात वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे हे मायलेकरू अनाथ झाले व छोटा डेबूजी आपल्या आईसह मामाकडे राहायला गेला.
डेबू मामाकडे शेतात खूप कष्ट करत असे; पण या मामाच्या शेतावर सावकाराने जप्ती आणली. निरक्षरतेमुळे सावकाराने मामाला फसवले होते. हे डेबूने जाणले. त्यामुळे स्वतः शिकलेला नसतानाही त्याला शिक्षणाचे महत्त्व उमगले. आपले उर्वरित आयुष्य हे त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी वेचले. या प्रबोधनासाठी ते भजन, कीर्तन, प्रवचन हा मार्ग वापरत.
१९१२ रोजी त्यांचा विवाह झाला होता; परंतु ते संसारात कधी रमलेच नाही, ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात गाडगे असे: म्हणून लोक त्यांना ‘ गाडगे महाराज’ किंवा ‘गोधडे महाराज’ म्हणत. ते कधीही एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट केल्याशिवाय कोणाकडून भिक्षाही स्वीकारत नसत.
त्यांच्याजवळ नेहमी झाडू असे आणि स्वतः झाडण्याचे काम करताना ते सर्वांना स्वच्छता राखण्याचा उपदेश करत. अगदी सामान्य लोकांच्या जीवनातील उदाहरणे घेऊन ते उपदेश करत. ‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशुंचा बळी देऊ नये’ अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून करीत असत.
स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते गरिबांना वाटून टाकत. त्यांना मिळालेल्या धनातून त्यांनी यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधल्या, लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले, नदीवर घाट देखील बांधले, अनेक ठिकाणी त्यांनी गोसंरक्षण संस्था उभारल्या. स्वत:साठी त्यांनी कोणाकडून कधीही काहीही घेतले नाही वा कधी कोणालाही शिष्य केले नाही. लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम करत असताना प्रवासातच अमरावतीजवळ १९५६ मध्ये त्यांचे देहावसान झाले, असा हा महान निरिच्छ सेवाभावी होता.
माझा आवडता कवी
Maza avadta kavi marathi nibandh
विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी होते; त्याचप्रमाणे नाटककार, ललित निबंधकार, कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते, पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग ‘नटसम्राट’ नाटकातील बेलवलकर असो, ‘कौन्तेया ‘तोल कर्ष असो वा ‘स्वप्नांचा सौदागर’ या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वातून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.
‘जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह १९३३ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘छंदोमयो’ अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.
कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी तिने अगदी सामान्य रसिकांची मनेही जिंकली आहेत. आपल्या या कचितांना कुसुमाग्रज स्वतः ‘समिधा’ म्हणतात –
‘समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.’
या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरबनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम आगगाडी आणि चिरडली जाणारी जमीन यांमधून प्रत्ययाला येतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांमधून प्रतीत होतो.
कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ गाऊ लागते; तर कधी ‘अहि-नकुलाच्या’ रूपकातून भिन्न प्रवृत्तीचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्ऱ्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, “ते होते जीवित अन् हा जीवितभास.” कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.
असा हा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेता माझा आवडता कवी १० मार्च, १९९९ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी भार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.
स्वातंत्र्यवीर सावरकर
Swatantra veer savrkar Essay in Marathi
तुजसाठी मरण ते जनन । तुजवीण जनन ते मरण ।।
असे स्वतंत्रतादेवीला सांगणारा तिचा सुपुत्र हाच खरा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सावरकरांनी आपल्या ‘माझे मृत्युपत्र’ या कवितेत भारतमातेला सांगितलंय की, आम्ही तिघे भाऊ तुझ्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहोत. पण आम्ही सात भाऊ असतो तरी जामही सातहीजण तुझ्यासाठी बळी गेलो असतो. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणे हे ‘ सतीचे वाण’ आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण अगदी विदद्यार्थिदशेपासूनच हा त्यांच्या मनाचा निग्रह होता.
इ. स. १८८३ मध्ये नाशिकजवळील भगूर इथे त्यांचा जन्म झाला होता. इटलीचा राष्ट्रपुरुष जोसेफ मॅझिनी हा त्यांचा स्फूर्तिदाता होता. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वीकारलेला मार्ग सावरकरांना खूप आवडला. पुण्याला महाविदयालयीन घेत असतानाच सावरकरांनी विदेशी कपड्याची होळी केली होती. बी. ए. झाल्यानंतर सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. तेथे समविचारी तरुणांची एक क्रांतिकारक गुप्त संघटना भारत’ सावरकरांनी निर्माण केली. एवढंच नव्हे, बाँम्ब तयार करण्याची पद्धतही मराठीत भाषांतर करून त्यांनी भारतात पाठवली.
सावरकरांच्या या कृल्यांचा ब्रिटिशांनी धसका घेतला, याच काळात मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारक तरुणाने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी ब्रिटिश सरकारने सावरकरांना लंडन येथे अटक केली. त्यांना भारतात आणले जात आता सावरकरांनी मार्सेलिस येथे समुद्रात उडी टाकून फ्रान्सचा किनारा गाठला. १९१० मध्ये त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली वे अंदमानच्या काळ्या कोठडीत रवाना केले गेले.
सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेत अतोनात हाल सहन केले. पण त्यांच्या मनातील देशभक्ती तसूभरही कमी झाली नाही. त्यांची ‘माझी जन्मठेप’ व ‘काळे पाणी’ ही पुस्तके सांनी देशप्रेमाखातर किती साहिले याची साक्ष देतात. सावरकरांना उत्तुंग कल्पनाशक्ती
आणि अफाट प्रतिभेचे वरदान लाभलेले होते. मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आस त्यांच्या काव्यातून, लेखनातून आणि भाषणातून व्यक्त होत असे. ‘जयोस्तुते’ ‘सागरा प्राण तळमळला’ यांसारखी अनेक प्रेरणादायी काव्ये, ‘विनायक’ वृत्ताची निर्मिती करणारे ‘कमला’ हे महाकाव्य, ‘शतजन्म शोधताना ‘सारखे भावकाव्य त्यांनी रचले. त्यांचे लेख, त्यांची नाटके त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीचे दर्शन घडवतात. बडोदा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी भाषाशुद्धीसाठीही स्वातंत्र्यवीरांनी खूप प्रयत्न केले व मराठी भाषेत अनेक नवीन शब्दांची भर घातली.
आपल्या उर्वरित आयुष्यात सावरकरांनी ‘हिंदू महासभे ‘वे व अस्पृश्यता निवारणाचे काम केले, १९६६ साली स्वातंत्र्यवीरांनी या स्वतंत्र भारतात आपल्या देहाचा त्याग केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांच्या देशप्रेमातून व साहित्यातून अमर झाले आहेत.